गोंदिया दि.11 :- शासन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अनुषंगाने ‘शासन आपल्या दारी’ तथा महाराजस्व अभियान शिबीर-2023 अंतर्गत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त गरजु नागरिकांना सदर योजनांचा लाभ मिळावा यादृष्टीने गोंदिया तालुक्यातील मौजा रावणवाडी येथे दिनांक 16 मे 2023 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजता दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरात गोंदिया तालुक्याअंतर्गत तहसिल कार्यालय गोंदिया, कृषि, नागर परिषद, आरोग्य, पंचायत, भूमि अभिलेख, कामगार, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, मत्स्यव्यवसाय व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जसे- महसुल विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राशन कार्ड संबंधित कामे, मतदार नोंदणी संबंधित कामे, आधार कार्ड अपडेशनची कामे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम 42 ड अंतर्गत अर्ज स्विकारणे, फेरफार अदालत, सातबारा दुरुस्ती तसेच वर नमुद केलेल्या विविध विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा जनतेला एकाच ठिकाणी लाभ घेण्याच्या दृष्टीने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी संबंधीत गरजु नागरिकांनी त्यांचे कामाशी निगडीत दस्ताऐवज व आवश्यक माहितीसह सदर शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी केले आहे.
